STAY WITH US

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Monday, 13 March 2017

राजकारणातील ‘सयामी जुळे’


राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्यावेळी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना अजूनही दोघे धुमसतानाच दिसताहेत. मुंबईसह 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका पार पडल्या. परंतु, सगळ्या राज्याचं लक्ष केंद्रित झालं होतं ते मुंबई महापालिकेत काय होणार याकडं. खरं पाहता, शिवसेना-भाजपनं राज्यापेक्षा मुंबई महापालिकेलाच अधिक महत्व दिलं. त्यामुळं कुणाचं काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शेवटी नंबर वन आम्हीच होणार असा दावा ठोकत शिवसेनेने तो खरा जरी ठरवला असला तरी, भाजपनंही त्यांच्या आसपासचं संख्याबळ मिळवून त्यांच्या नंबर वनचं महत्व अगदीच कमी करून टाकलं.
गेली 27-28 वर्षे एकत्रितपणे निवडणुका लढवणारे सेना-भाजप 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती धर्म तोडून वेगळे झाले. दोघांनीही एकमेकांची ताकद आजमावली. लोकसभेनंतर मोदींची लाट कायम असल्यामुळे त्याचा फायदा भाजपनं चांगलाच करून घेतला. 122 जागांवर मजल मारत शिवसेनेचा मोठा भाऊ आपणच हे सिद्ध केलं. आतापर्यंत भाजपला शिवसेनेचा लहान भाऊ म्हणूनच राहावं लागलं होतं. पण, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षाच्या महत्वाकांक्षा बदलत गेल्या. त्यानुसारच त्यांच्या रणनीती ठरत गेल्या. प्रत्यक्षात याचा फटका त्या दोघांना फारसा बसलाच नाही. उलटपक्षी एकमेकांच्या जागा वाढवण्यात त्यांना यश आलं. सोबतच त्यांच्या मतांचा टक्काही वाढताना दिसला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तुळजाभवानीचं कुटुंबासह दर्शन घ्यायला आलेल्या उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मंत्री घेऊन पुढे दर्शनाला येईन, असं बळ दे...असं साकडं देवीला घातलं होतं. त्यानंतर झालेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत दोघांनीही म्हणजे शिवसेना-भाजपनं एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कधी-कधी तर टीकेची पातळीही ओलांडलेली पाहायला मिळाली. परिणामस्वरूप दोघांच्या पदरात अपेक्षित असं यश पडलं नसलं तरी, विरोधकांच्या जागा पटकावण्यात मात्र ते सरस ठरले. तसाच पायंडा पुढे कल्याण-डोंबिवली आणि आता महापालिका, तसंच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला.

2014 ला विधीमंडळात शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय देवेंद्र फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. पुढे 70 दिवस विरोधात बसलेल्या शिवसेनेला सत्तेत जाण्याची घाई झाली. त्यानंतर वेगानं चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली. पुन्हा सत्तेत मिळालेल्या मंत्रिपदावरून आणि त्यांच्या हक्कावरूनही या दोघांमधली सुंदोपसुंदी पाहायला मिळाली. वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांवर इतकी टोकाची टीका सत्तेत राहून करून देखील, ते एकमेकांपासून फारकत घ्यायला तयार नाहीत. म्हणूनच त्यांना राजकारणातील सयामी जुळे म्हणून संबोधायला हरकत नाही. कारण, सयामी जुळ्यांची अडचण अशी असते की, ते काहीही झालं तर एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. दोघांपैकी एकाची इच्छा झाली म्हणून त्यानं ठरवलं की, आता आपण आपल्या बाजूकडे सगळं खेचून नेऊ, तर त्यावेळी दुसऱ्यालाही त्याच्यासोबत फरफटत जावं लागतं. दुसऱ्यानं खेचलं, तर पहिल्याला त्याच्याकडे जावंच लागतं. अशी ही सयामी जुळ्यांची परिस्थिती असते. अगदी अशीच काहीशी परिस्थिती भाजप आणि शिवसेनेची झालेली आहे.
सत्तेतला अधिकाधिक वाटा मिळावा म्हणून सत्तेत राहूनदेखील एकमेकांवर जोरदार टीका करून विरोधकांची जागाही आपणच घ्यायची, त्याच्यासोबतच त्यांच्या मतांचा टक्का आपल्याच आरोप-प्रत्यारोपातून खेचण्याचा प्रयत्न करायचा. त्यात हे दोघे काही प्रमाणात निश्चित यशस्वी झाले. पण सत्तेत राहून विरोधी भूमिका कायम ठेवत किती दिवस हे असंच चालणार हा ही प्रश्न आहेच. सयामी जुळ्यांना असं करून चालतच नाही. दोघांनाही कुठल्यातरी मुद्यावर एकमेकांशी तडजोड करावीच लागते. एकवेळ पहिल्याचं, तर कधी दुसऱ्याचं ऐकून घ्यावंच लागतं. कल्याण-डोंबिवलीत लढताना एकमेकांचा दोघांनी इतका उद्धार केला की बस्स! पण शेवटी काय झालं, एकमेकांपासून विभक्त होताना फारच त्रास होईल म्हणून, हा ह्या परिस्थितीत सोबतच राहूया असं म्हणून शेवटी भाजप-सेनेनं जुळवून घेतलंच की...

हिंदुत्वाच्या विचारावर एकत्र आलेले शिवसेना-भाजप हा मुद्दा स्वतःपासून दूर करून एकमेकांशी फारकत तर घेऊच शकत नाहीत. अशावेळी फक्त मुद्दा हाच आहे की, जन्माने कुणी कुणाला मोठा मानायला लागला तर, जनसंघापासूनचं भाजपचं नातं सांगून भाजप म्हणतोय मीच मोठा...त्यापुढे जाऊन शिवसेना म्हणते की, भाजपला महाराष्ट्रात आम्ही रूजवलं, आमच्या बळावरच भाजप इथं वाढली, त्यामुळं राज्यात आम्हीच मोठे...प्रत्यक्षात ही परिस्थिती अशी झालीय की, जेव्हा जुळ्यांचा जन्म होतो, त्यावेळी कोण आधी जन्मला तो मोठा, असा प्रघात रूढ आहे. पण जेव्हा ते मोठे होतात, त्यावेळी त्यांच्यातला लहान मोठा ओळखणं फारच कठीण असतं. बरोबरीनं वाढत असताना दोघेही दावा करत असतात की, आपणच कसे मोठे आहोत. तसंच सध्या दोघांमध्ये अर्थात शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू आहे.
पण, इथं हा मुद्दा जुळ्यांच्या बाबतीतला नाहीच मुळी. कारण आता इतके दिवस जेव्हा केव्हा सत्ता आली, त्यावेळी एकत्र सत्तेचा आस्वाद घेतल्यानंतर हे दोघे इतक्या झटपट फारकत घेऊच शकत नाहीत. पूर्वी बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी यासारखी मंडळी दोन्ही पक्षात होती. त्यावेळी सत्ताकारणासाठी एकमेकांना समजून-उमजून ते निर्णय घ्यायचे. एकमेकांशी जुळवून घ्यायचे. छोटा भाऊ-मोठा भाऊ हा मुद्दाच नसायचा. पण, बाळासाहेब गेले, वाजपेयी गेल्या काही दिवसांपासून आजारीच आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर भाजपमधल्या अडवाणी पर्वाचा अस्त सुरू झाला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर शिवसेना-भाजपमधला दुवाही निखळला. तिकडे शिवसेनेतले मनोहर जोशी, लीलाधर डाके ही ज्येष्ठ नेते मंडळी केवळ मोठ्या सभांच्या व्यासपीठापुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळंच पुढे या दोन पक्षात छोटा भाऊ-मोठा भाऊ अशी तुलना सुरू झाली.

अशी तुलना सुरू असतानाच त्यांना एवढं कळून चुकलं होतं की, महाराष्ट्रात ते एकमेकांच्या आधाराशिवाय सत्ताकारण करूच शकत नाहीत. याच गोष्टीमुळे कालांतराने जुळ्या भावाच्या भूमिकेत वावरणारे शिवसेना-भाजप या दोन पक्षांचं रूपांतर सयामी जुळ्यांमध्ये झालं. या परिस्थितीत दोघांनी कोणतीही बाजू कितीही खेचली, तर त्यापैकी एकाला त्याच्यासोबत फरफटत जाण्याशिवाय पर्याय नाही हे वास्तव आहे. मुंबईच्या महापौर निवडीवरून अगदी हेच सिद्ध होतंय. परिस्थितीत अशी आहे की, इथेसुद्धा सेना-भाजप दोघांना सोडून राहू शकत नाहीत. कारण इथल्या सत्ताकारणात त्यांना काँग्रेससोबत जाऊन चालणार नाही. शेवटी विचारांचा मुद्दा येतोच ना!  भाजपही शिवसेनेला वगळून पुढे जाऊच शकत नाही. कारण तसं करायचं असेल तर त्यांनाही अशा परिस्थितीत काँग्रेसला सोबत घ्यावं लागेल. एकीकडे देशात काँग्रेसमुक्त भारताचा नारा द्यायचा आणि इथे मात्र त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करायचा म्हटला तर थेट पक्षाशीच प्रतारणा केल्यासारखं होईल. त्यामुळं भाजपला ते परवडणारं नाही. 1978 साली बाळासाहेबांनी त्यावेळी राजकीय हुशारी दाखवत मुरली देवरांना मुंबईचा महापौर करण्यासाठी सेनेचा पाठिंबा दिला. त्याबदल्यात वामनराव महाडिकांच्या आमदारकीला काँग्रेसचा पाठिंबा घेऊन आपला एक आमदार विधीमंडळात पाठवला होता. पण आता ती परिस्थिती नाही.
निवडणुकीच्या काळात रामायण-महाभारत आधुनिक अवतारात पाहायला मिळालं असलं तरी, आता छोटा भाऊ-मोठा भाऊ हा उरलाच नाही. कारण दोघांनाही अगदी एकमेकांच्या जवळ जाणारं संख्याबळ मिळालंय. आता त्यांचं रूपांतर सयामी जुळ्यांमध्ये झालं आहे. अशावेळी त्यांना एकमेकांच्या मुद्यांवर जुळवून घेतल्याशिवाय इलाज नाही. कारण, सयामी जुळे कितीही म्हणत असले आम्हाला वेगळं करा, तर तसं करता येत नाही. किंबहुना, तसं करायचं झालं तर फार मोठं ऑपरेशन करावं लागतं, ते कोण करणार हा प्रश्न आहेच की...त्यामुळं आता शिवसेना-भाजपला एकमेकांशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे वास्तव दोन्हीकडच्या नेत्यांना मान्य नसलं तरी स्वीकारावं तर लागेलच...या दोघांनी अशा सयामी जुळ्यांच्या भूमिकेत राहण्यापेक्षा संयमी जुळ्यांची भूमिका घेतली तर अधिक बरं होईल.

Wednesday, 1 March 2017

 संगीतातला ‘शुक्रतारा‘




      प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर राष्ट्रपती भवनातून पद्म पुरस्कारांची घोषणा होते. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे पुरस्कार जाहीर केले जातात. 25 जानेवारी 2010 साली ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भारत सरकारनं पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित करणार असल्याचं जाहीर केलं. आयबीएन लोकमतला असल्यामुळे पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर संपादकांनी लगेच श्रीनिवास खळे यांची मुलाखत घेण्यासाठी मला जायला सांगितलं. त्यावेळी संध्याकाळचे साडेसात वाजले होते. मी काकांना फोन केला. फोन उचल्यानंतर मोठ्या आनंदाने त्यांनी मुलाखतीसाठी होकार दिला.



      विक्रोळीतून श्रीनिवास खळे यांच्याकडे घराकडे आम्ही जायला निघालो. रस्त्यातली वाहतुकीची कोंडी पाहता त्यांच्या घरी पोहोचायला मला रात्रीचे 11.30 वाजले होते. मी जाताना फुलांचा छान गुच्छही घेऊन गेलो होतो. पण एवढा वेळ झाला म्हटल्यावर मी जरा घाबरतच त्यांच्या घराची बेल वाजवली. त्यांची धाकटी मुलगी संजीवननं दार उघडलं. मी माझी ओळख करून देण्याआधीच त्यांनी विचारलं आयबीएन लोकमतमधून आलात ना...मी म्हटलं हो...संजीवन म्हणाल्या या काका तुमचीच वाट बघत बसलेत. मला धक्काच बसला. त्यावेळी श्रीनिवास खळेंचं वय 84 वर्षे होतं. मी त्यांच्या खोलीत गेलो. एवढं वय झालेलं असताना, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माझ्या आधी अनेकजण आप्त-स्नेही त्यांना येऊन भेटून गेले होते. अनेकांनी फोन करून त्यांचं अभिनंदन केलेलं होतं. एवढ्या सगळ्यांशी बोलल्यानंतर ते थकून गेले असतील, असा माझा कयास होता. पण, त्यांनी ज्या हसतमुखानं माझं जोरदार स्वागत केलं. त्यावरून मला असं जाणवलं की, या माणसाकडं किती ऊर्जा असेल.
      माझा फुलांचा गुच्छ स्वीकारून झाल्यावर त्यांनीच मला पेढा भरवला, आणि म्हणाले, अरे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळंच हा सन्मान मिळालाय...मग पेढा तुम्हालाच आधी भरवला पाहिजे. हे ऐकून माझे डोळे पाणावले. किती अतीव प्रेम खळे काकांच्या हृदयात होतं. याचा पहिलाच अनुभव मी घेतला. हे सगळे सोपस्कार पार पाडेपर्यंत रात्रीचे 12 वाजून गेलेले होते. मी म्हटलं काका, मुलाखतीला सुरु करूयात का ? त्यावर ते म्हणाले, ‘’ मुलाखत तर होईल रे...आधी चहा घेऊ, अशा गप्पा मारायची संधी काय परत-परत थोडीच येते. होईल की मुलाखत....असं म्हटल्यावर मी थोडा आवाकच झालो. मी त्यांना अहो काका, रात्रीचे सव्वा बारा वाजलेत. संध्याकाळपासून अनेकजण तुम्हाला भेटायला येताहेत. बराचवेळ तुम्ही सातत्याने फोनवर बोलत आहात. वयोमानाप्रमाणं आता विश्रांतीही घ्यायला हवं. पण त्यावरही त्यांनी हासून उत्तर देत मला म्हणाले, अरे, वय आहे म्हणून तुम्ही-आम्ही आहोत. तेच आपल्या हातात नसतं, तर हा संवाद झाला असता का रे ?” असा उलट प्रश्न मलाच विचारल्यानंतर मी शांतच झालो.



      अनेक कवींच्या शब्दांना स्वरसाज चढवताना त्या शब्दांमागचा नेमका अर्थ ओळखून त्याला संगीत देताना, तुमच्या आमच्या जगण्याला वेगळा आयाम देणारे खेळकाका हे अवलिया संगीतकार होते. कवींच्या, गीतकाराच्या शब्दांमधली आर्त हाक असेल किंवा त्यात जाणवणारी सल असेल,  हे सगळं खळेकाकांनी त्यांच्या संगीताच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत पोहोचवली. दोन भारतरत्नांना एकत्र आणून राम शाम गुणगान यासारखं अजरामर गीत त्यांनी आपल्या भेट दिलंय. यातली दोन भारतरत्नं म्हणजे पं. भीमसेन जोशी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर...



      तुकोबारायांच्या गाथेमधील काही निवडक अभंगांना अवीट गोडीच्या चाली खळेकाकांनी दिल्या. खासकरून यातल्या काही निवडक अभंगांविषयी सांगताना खळेकाका खूपच भूतकाळात रममाण व्हायचे. जेव्हा-जेव्हा त्यांना भेटलो त्या-त्या वेळी या सगळ्या गाण्यांविषयी त्यांच्याशी गप्पा मारताना अगदी ताजंतवानं झाल्यासारखं वाटायचं. पुढच्या महिनाभराची ऊर्जा मिळून जायची. मूळातच खळेकाका ही मूर्तीच अशी होती की, त्याला वात्सल्याची, कनवाळूपणाची किनार होती. काकांना भेटल्यानंतर आपण आपल्या आईशीच तिच्या मांडीवर डोकं ठेवून गप्पा मारतोय असा भास व्हायचा. इतकं उत्कट प्रेम काकांच्या बोलण्यातून जाणवायचं. त्यांच्यातल्या याच आपुलकीने ते सर्वांचे काका झाले.

      पहिल्या भेटीत बोलताना काकांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार सांगितलेला एक किस्सा....जो तुमच्या आमच्या आयुष्यालाही वेगळं वळण देऊन जातो. संगीताची साधना करायची, त्याची सेवा करायची म्हणून खळेकाका आपल्या कुटुंबियांसोबत बडोद्याहून मुंबईला आले. सोबत त्यांची लाडकी हार्मोनियमही. खूप दिवस मुंबईत काढल्यानंतर फारसं काही काम हाताला मिळेना म्हणून खळेकाका निराश झाले होते. हे नैराश्य एवढं पराकोटीचं होतं की, आता सगळं सोडायचं, अगदी हार्मोनियमही... या विचाराने त्यांच्या मनात घर केलं होतं. वैतागून एकेदिवशी ते बायकोला म्हणाले, ‘’ अगं, आता मुंबईत राहण्यात काही अर्थ नाही, ज्या उद्देशानं मुंबईत आलो ते काही साध्य होताना दिसत नाही. ही हार्मोनियम घेऊन मी बाजारात जातो आणि विकतो. त्यातून जे पैसे येतील ते घेऊ आणि गावाकडे निघून जाऊ.’’ त्यावर काकूंनी मनाला खंबीर करत काकांना उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ‘’ असं करा, ही हार्मोनियम विकतो म्हणताय तर काही हरकत नाही, पण त्यातून जे पैसे मिळतील, त्यात एक विषाची बाटलही आणा. घरी आल्यावर ते विष दोघेही थोडं थोडं घेऊ, म्हणजे सगळं संपून जाईल.’’ काकूंच्या उत्तरानं काकांच्या अंतर्मनातल्या तंबोऱ्याच्या तारांनी तार सप्तक गाठला होता. त्याक्षणी काकांनी निर्णय घेतला. नाही, आतापर्यंत या हार्मोनियमनं जी साथ दिली आहे. तिला असं एकटं सोडून कुठंच जायचं नाही. त्यावेळीच काका म्हणाले आता मागे हटायचं नाही, हार्मोनियमच्या भात्यातून मिळणाऱ्या हवेतून निर्माण होणाऱ्या स्वरांना नवा साज चढवत संगीत क्षेत्रात एक अढळ स्थान निर्माण करायचं. ते त्यांनी केलंसुद्धा.


      पण, एवढ्या उंचीची संगीत साधना केल्यानंतर शेवटपर्यंत खेळकाकांनी त्यांचा जमिनीवरचा पाय मात्र हलू दिला नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू. स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांवर मात खळेकाकांनी त्यांचं अढळ स्थान निर्माण केलं असलं तरी, त्यांनी त्यांच्या शिष्यांना उत्तम मार्गदर्शन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत केलं. तेही हसतमुखाने, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता.

      गीतकार मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे आणि गायक अरूण दाते असं हे त्रिकूट या मराठी संगीताच्या क्षेत्रावर कितीतरी काळ अधिराज्य करत होतं. पाडगावकारांनी गीत लिहायचं आणि खळेकाकांनी चाल लावायची आणि अरूणकाकांनी ते गायचं...अरूण दातेंकडून शुक्रतारा मंदवारा हे अजरामर गीत गाऊन घेऊन काकांनी या महाराष्ट्राला भावगीतांची फार मोठी देणगी दिली आहे. 
  
      खळेकाका जेव्हा ठाण्यात राहायला आले, तेव्हा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे जाणं व्हायचं त्यावेळी फक्त आणि फक्त गाण्यांच्याबाबतीतच गप्पा व्हायच्या. त्यांच्याशी बोलताना कधीच असं जाणवायचं नाही की, आपण एखाद्या महान संगीतकाराशी बोलतोय. असं वाटायचं की, आपण आपल्या आजोबाशीच लाडाने गप्पा मारतोय. खरंतर हे आजकाल अशा गप्पा मारण्या इतक्या मोठ्या कलाकाराशी सहज शक्य होतच नाही. किंबहुना झालं तरी जेवढा खळेकाका द्यायचे तेवढा वेळ मिळेल की नाही याबाबत साशंकताच. पण, खळेकाकांनी यासाठीच कधीच हात आखडता ठेवला नाही, विंदांनी जसं म्हटलंय त्याप्रमाणे देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे....या ओळीप्रमाणंच काका त्यांचं आयुष्य जगले.


      खळेकाकांच्या सानिध्यात राहून मला माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या केवळ शब्दातून मांडून कधीच संपणार नाहीत. जितकं काकांचं संगीत कानांमध्ये गुंजत राहतं, त्याचप्रमाणे त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानंतर त्यांच्या ती हास्यमुद्रा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. आजही असं वाटतं की, त्यांच्या हास्यमुद्रेतून...बगळ्यांची माळ फुलत असणार, गोरी गोरी पान फुलासारखी छान असं म्हणत अनेक माता-भगिनी जगत असताना दिसतात. इतकंच नाही, तर रात्री आपलं बाळ शांत झोपावं म्हणून निज माझ्या नंदलाला नंदलाला रे असं म्हणत अंगाई गीत गाणारी आई दिसते. तारूण्याचे रंग उधळणारे तरूण जेव्हा एकमेकांच्या प्रेमात अडकतात, तेव्हा प्रेमाच्या गुजगोष्टी करताना शुक्रतारा मंदवारा, याबरोबरच जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा....असं म्हणत पावसाळ्यात श्रावणात घननिळा बरसला असा अंदाजही व्यक्त करत असतील. प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकलेल्या नवतरूणांना देखील काकांच्या संगीतानं भुरळ घालून लाजून हासणे आणि हासून ते पाहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे असं म्हणायला लावून प्रेमाची मिठी अधिक घट्ट करायला लावली. हे विसरून चालणार नाही. गृहस्थाश्रमात गेलेल्यांना अभंग तुकयाचे असेल किंवा अभंगवाणीच्या माध्यमातून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेऊनिया असं आळवायला लावलं. इतकंच नाही, तर हे आळवून झाल्यावर विठ्ठलाच्याबाबतीत पं. भीमसेन जोशींच्या आवाजात राजसकुमार मदनाचा पुतळा असं म्हणायला लावून विठ्ठलाचं दर्शन घडवलंय. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख....या गाण्याने तर खळेकाकांनी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतला.

      खळेकाका ही व्यक्तीच अशी होती की, त्यांच्याबद्दल आपण जितकं सांगू तेवढं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडताना शब्दालाही लाजल्यासारखं वाटेल, असा त्यांचा प्रवास आहे. माझ्या आयुष्याच्या टप्प्यात खळेकाकांची भेट म्हणजे मला मिळालेला कोहिनूर हिरा आहे. याच शब्दांच्या संग्रहापलीकडे जाऊन त्यांच्या संगीताचे सूर आजही मला अनेक कठीण प्रसंगात सोबतीला असतात. प्रत्येक संकट आलं आणि समस्या उभी राहिली की, काकांची मूर्ती डोळ्यासमोर येते आणि संकट ओलांडण्याची ताकद मिळते. हेच तर ते बंध आहे, ज्यावर तुमचं आमचं नातं रेशीमगाठीसारखं घट्ट टिकून आहे.    


      मराठी संगीतक्षेत्राला इतकं सारं देऊन काकांनी शेवटपर्यंत खळेकाकांनी कमावलं काय तर फक्त संगीताची साधना...शेवटी त्यांच्यासोबत काय होते तर हार्मोनियममधून निघालेले सप्तसूर...आजही काकांबद्दल सांगताना असं म्हणावसं वाटतं....या चिमण्यांनो परत फिरा रे....